आयुष्य उतू जात आहे
मोठ्या मोठ्या सुखांच्या मागे धावतांना
छोट्या छोट्या दुखांनी ठेचाळतांना
जणू सवय दु:खांची झाली असता
चुकून आलेच सुख हातात तर
डोळ्याची कडा पाणावतांना
आयुष्य उतू जात आहे ||
वाटते तू येणार तू येणार
स्पर्शाने तुझ्या मन माझे फुलणार
तुझ्या सहवासात मी आकाशात झुलणार
विचार हे मनात सजवून
तुझी वाट पाहतांना
आयुष्य उतू जात आहे ||
मी तसा जगलोच कुठे
संघर्ष माझे श्वास होते
गाठणे उंच शिखर कोणते
असले कधी अमुचे ध्यास होते ?
कष्टांची डोळ्यात झोप होती
भुकेचे पोटात दोन घास होते
तरी उद्या पहाट होईल हि आशा फुलावतांना
आयुष्य उतू जात आहे ||
एकटीच अपुली इथली वाट
एका हातात दुसरा हात
पायाखालची जमीन अन
आकाशाची सोबत रात
एवढे एकटेपण कि
अनोळखी वाटे आपुलाच आवाज
या गर्दीतल्या वाटेवर धावतांना
आयुष्य उतू जात आहे ||
मनात तुझे प्रेम दाटले
जगणे हेच असावे असे वाटले
फुला फुलांशी हितगुज केले
जीवनात नवे रंग दिसले
तुझ्या आठवणीत डोळे मिटतांना
आयुष्य उतू जात आहे ||
-अमित जहागीरदार
१६ ऑक्टोंबर २०१२
No comments:
Post a Comment