Monday, August 19, 2013

Viraah

विरह….

आठवतो का तो रस्ता तुला
ज्यावरून आपण चालायचो
हातात हात घेवून
तास न तास
तो आहे तसाच काळाशार
पण घेतोय वाळक्या गवताचे श्वास
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तो चंद्र तुला
आपण पाहायचो
जागवून पूर्ण रात
बसायचो त्या चांदण्यात न्हात
तो आजकाल उगवत नाही
किंवा लपून बसतो ढगात
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवत का ते झाड गुलमोहराचं
तू आणि मी भेटल्यावर हमखास फुलणारं
आता नुसतं जाणवतेय
त्याच हिरवेपण
त्याला आजकाल आठवत नाही
काय असत फ़ुलण
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का पूल नदीवरचा तुला
तू बघत बसायची पाणी  झुळझुळणारं
मी शोधत बसायचो डोळ्यात तुझ्या
काहीतरी लुकलुकणार
आजकाल त्या पाण्यात काहीच नसत थरथरणारं
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

 आठवते का ती वाळू सागरावरची
जिच्यावर आपण छोटास  घर रचयचो
एकच स्वप्न चार डोळ्यांनी बघायचो
जे होणार आहे साकार
पण ती वाळू आजकाल
घेत नाही कोणताच आकार
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तुला तो प्राजक्त
तुझ्या वाटेत वाकडा सांडणारा
तुझ्या स्पर्शाने
लाजत फुलणारा
तो बहरायचा थांबलाय
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतोय का तो पाऊस तुला
पडायचा जेव्हा आपण भेटायचो
हातात हात घेवून चिंब भिजायचो
तो शिंपडायचा आपल्यावर
चैतन्याचा सडा
आजकाल मला वाटतो तो पूर्ण कोरडा
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

- अमित जहागीरदार
वर्ष -२०००
सांगली

Kavita...Ek Kavita

कविता …एक कविता

वेड लागेल तुला
माझ्यावर प्रेम करता करता
"काय करतोस दिवसभर ?"
तर म्हणतो कविताच कविता

मी दिसली की कविता
मी हसली की कविता
मी रुसली की कविता
मी जवळ नसली कि कविता

ढग दाटलेत की कविता
मी केस धुतलेत की कविता
मी तुझ्यावर रागावले की कविता
मी तुझ्याजवळ बसले की कविता

केसात गजरा  माळला की कविता
अंगणात पारिजात फुलाला की कविता
मी आले उशिरा की कविता
वारा सुटला थिजवनारा की कविता

मी रंग खेळले की कविता
मी गंध लावले की कविता
मी तुझ्याकडे नाही दिले लक्ष की कविता
मी पाहिले तुझ्याकडे तर लक्ष लक्ष  कविता

मी स्वप्नात आली की कविता
मी मंद लाजली की कविता
मी तुझ्यासाठी जागली की कविता

मी "हो" म्हणाली त्याची  एक कविता
तुझ्या मनातली प्रेमाची एक कविता
कधी म्हणतोस तूच एक कविता
खर सांगू तुझं -माझं प्रेम हीच एक कविता

-अमित जहागीरदार
 ०५/०५/२०००
 सांगली

Sunday, January 27, 2013

भिजणे

भिजणे

आता कळलाय मला अर्थ
तुझ्या तसल्या बोलण्याचा
आणि तुझ्या नुसतेच पाय
पाण्यात बुडवून तसूभर भिजण्याचा
मी तुला म्हटलं
ये ना जरा अशी खोल पाण्यात
भीज न चिंब चिंब माझ्या
अथांग प्रेमात

तर तू म्हणालीस - नको
मी अशीच काठावर बसते
नुसते पाय भिजवले तर बर असतं
एवढ्या खोलवर गेल कि पाणी डोक्यात मुरत

मी म्हणालो भिजण्यात मौज असते
तुझ्या प्रेमात बुडून जावस वाटत
तर तू म्हणालीस अस काठावर राहणंच बर असत
मनात येईल तेव्हा भिजता येत
आणि क्षणात भिजलेल अंग कोरडा करता येत
मला वाटल तुला सर्दीचा त्रास आहे
म्हणून स्वताला जपतेस
पण तुला भिजायचं नसते माझ्या प्रेमात पूर्ण
म्हणून तू नुसतेच पाय टाकून बसतेस

आत्ता मला कळलाय मला अर्थ
तुझ्या त्या तसल्या बोलण्याचा
आणि तुझ्या नुसतेच पाय
पाण्यात बुडवून तसूभर भिजण्याचा

- अमित जहागीरदार
१२ एप्रिल 2000

देवपण

देवपण

भोगले किती मी आनंदाने ! आता तर दुखालाही दुख वाटले
अजूनहि दिलेस दुख तर
विचारावेसे वाटेल कि कोणी तुला देव म्हटले

मी पचवत गेलो वार तुझे कधी मनावरचेही
आणि जखमांमधून ही तुझे गाणे निघाले

पाडलेस तू माझे स्वप्न आकाशात नेवूनी
थरथरत्या हातांनी मी कित्येकदा आशांचे घर रचले

मी वाट बघितली रोज पहाट होण्याची
आणि तू सकाळी दारात माझ्या अंधाराला पाठवले

हे तसे रोजचेच आता तू मला मोजकेच श्वास देतोस
त्याबदल्यात मी तुला ओठांवरचे हसू दिले

दिलेस कधी सुख तू चुकून माझ्या ओंजळीत
त्यातही सवयीने मी दुख शोधले !!!!!!!!!

किती आहे दुख तुझ्याकडे किती मला जगावे लागेल
नेहमीच्या दुखासोबत हेच आता प्रश्न उरले !!!!!

- अमित जहागीरदार
18 ऑगस्ट 2012

अनाहूत

अनाहूत


खुलली मेहंदी हातावरी
कितीदा मनात माझ्या ||
सूर तुझे छेदिले मी
कितीदा गाण्यात माझ्या ||

मी झुरते तुझ्यासाठी
मी सजते तुझ्यासाठी
आले तुझे गंध चहूकडे
कितीदा घरात माझ्या ||

मी नव्हते रूपगर्विता
पण वाटे तू बघता
स्वप्नांचे सोहळे रचिले
कितीदा दर्पणात माझ्या ||

तुझा स्पर्श आठवताच
अगणित फुलती रोमांच
चांदण्यांची रात्र जागली
कितीदा मनात माझ्या ||

मी हरवते तुझ्यात
शोधते तुलाच सगळ्यात
तू गेलास दूर निघुनी
हलकेच आले ध्यानात माझ्या ||


अमित जहागीरदार
१३ मार्च २००५

प्रेम करा प्रेम

प्रेम करा प्रेम


 
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत
प्रेम केल कि आपल्याशी बागेतलं फुल बोलत ।।

मनात प्रत्येक क्षणी तीच अन तिचा विचार
भोवतालची सृष्टी सगळी भासते तिचा अविष्कार
तोच गंध ती हवा
तोच तारा एक नवा
गंधासवे होवून वारा वाहून जा
आकाशात होवून तारा डोलून जा

मग ते आकाशही इवलस वाटत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

प्रीतीच्या गाण्याशिवाय दुसर काही गात नाही
तिच्या आठवणी शिवाय एकही क्षण जात नाही
तिचा चेहरा तिचे डोळे
आपण होतो पुरते खुले

तिच्या डोळ्यातच सार विश्व दिसत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

आकाशात जेव्हा संध्येचे नारंगी रंग उधळू लागतात
आपल्याला नकळत तिच्या भेटण्याचे वेध लागू लागतात
तिचं बोलणं तिचं हसण
त्यात आपल भान विसरणं
तिच्या हसण्यावर वाहून जा
धुंद धुंद तिच्यात बुडून जा

त्यावेळी हृदय आपल धडधडायाच थांबत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

ढग जमतच आकाशात तिच्या घरी जायचं
कुठल्यातरी बहाण्याने तिच्यासोबत फिरायचं
पावसाची रिमझिम बरसात
हाती तिचा चिंब भिजलेला हात
ढगांवर नभातल्या डोलून जा
पावसाचा थेंब होवून बुडून जा

चिंब चिंब भिजणे त्या क्षणी कळत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

तिला म्हणावं काहीतरी आणलाय गोड तुझ्यासाठी
ती लाजतच मारावी गच्च तिला मिठी
सगळ सुख तिच्या मिठीत असत
चांदण आपल्या मिठीत हसत

तिथेच मनही आपल विसरून जा
एक होवून तिच्यात विरून जा

अन ओठांवरती ओठांच गाणं फुलत
प्रेम करा प्रेम ,प्रेम खूप सुंदर असत ।।

- अमित जहागीरदार
१९ नोव्हेंबर २०००

आयुष्य उतू जात आहे

आयुष्य उतू जात आहे
मोठ्या मोठ्या सुखांच्या मागे धावतांना
छोट्या छोट्या दुखांनी ठेचाळतांना
जणू सवय दु:खांची झाली असता
चुकून आलेच सुख हातात तर
डोळ्याची कडा पाणावतांना
आयुष्य उतू जात आहे  ||

वाटते तू येणार तू येणार
स्पर्शाने तुझ्या मन माझे फुलणार
तुझ्या सहवासात मी आकाशात झुलणार
विचार हे मनात सजवून
तुझी वाट पाहतांना
आयुष्य उतू जात आहे ||

मी तसा जगलोच कुठे
संघर्ष माझे श्वास होते
गाठणे उंच शिखर कोणते
असले कधी अमुचे ध्यास होते ?
कष्टांची डोळ्यात झोप होती
भुकेचे पोटात दोन घास होते
तरी उद्या पहाट होईल हि आशा फुलावतांना
आयुष्य उतू जात आहे ||

एकटीच अपुली इथली वाट
एका हातात दुसरा हात
पायाखालची जमीन अन
आकाशाची सोबत रात
एवढे एकटेपण कि
अनोळखी वाटे आपुलाच आवाज
या गर्दीतल्या वाटेवर धावतांना
आयुष्य उतू जात आहे ||

मनात तुझे प्रेम दाटले
जगणे हेच असावे असे वाटले
फुला फुलांशी हितगुज केले
जीवनात नवे रंग दिसले
तुझ्या आठवणीत डोळे मिटतांना
आयुष्य उतू जात आहे ||

-अमित जहागीरदार
  १६ ऑक्टोंबर २०१२