Monday, August 19, 2013

Viraah

विरह….

आठवतो का तो रस्ता तुला
ज्यावरून आपण चालायचो
हातात हात घेवून
तास न तास
तो आहे तसाच काळाशार
पण घेतोय वाळक्या गवताचे श्वास
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तो चंद्र तुला
आपण पाहायचो
जागवून पूर्ण रात
बसायचो त्या चांदण्यात न्हात
तो आजकाल उगवत नाही
किंवा लपून बसतो ढगात
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवत का ते झाड गुलमोहराचं
तू आणि मी भेटल्यावर हमखास फुलणारं
आता नुसतं जाणवतेय
त्याच हिरवेपण
त्याला आजकाल आठवत नाही
काय असत फ़ुलण
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का पूल नदीवरचा तुला
तू बघत बसायची पाणी  झुळझुळणारं
मी शोधत बसायचो डोळ्यात तुझ्या
काहीतरी लुकलुकणार
आजकाल त्या पाण्यात काहीच नसत थरथरणारं
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

 आठवते का ती वाळू सागरावरची
जिच्यावर आपण छोटास  घर रचयचो
एकच स्वप्न चार डोळ्यांनी बघायचो
जे होणार आहे साकार
पण ती वाळू आजकाल
घेत नाही कोणताच आकार
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतो का तुला तो प्राजक्त
तुझ्या वाटेत वाकडा सांडणारा
तुझ्या स्पर्शाने
लाजत फुलणारा
तो बहरायचा थांबलाय
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

आठवतोय का तो पाऊस तुला
पडायचा जेव्हा आपण भेटायचो
हातात हात घेवून चिंब भिजायचो
तो शिंपडायचा आपल्यावर
चैतन्याचा सडा
आजकाल मला वाटतो तो पूर्ण कोरडा
कारण, तू नाहीस ना सोबत माझ्या ।।

- अमित जहागीरदार
वर्ष -२०००
सांगली

Kavita...Ek Kavita

कविता …एक कविता

वेड लागेल तुला
माझ्यावर प्रेम करता करता
"काय करतोस दिवसभर ?"
तर म्हणतो कविताच कविता

मी दिसली की कविता
मी हसली की कविता
मी रुसली की कविता
मी जवळ नसली कि कविता

ढग दाटलेत की कविता
मी केस धुतलेत की कविता
मी तुझ्यावर रागावले की कविता
मी तुझ्याजवळ बसले की कविता

केसात गजरा  माळला की कविता
अंगणात पारिजात फुलाला की कविता
मी आले उशिरा की कविता
वारा सुटला थिजवनारा की कविता

मी रंग खेळले की कविता
मी गंध लावले की कविता
मी तुझ्याकडे नाही दिले लक्ष की कविता
मी पाहिले तुझ्याकडे तर लक्ष लक्ष  कविता

मी स्वप्नात आली की कविता
मी मंद लाजली की कविता
मी तुझ्यासाठी जागली की कविता

मी "हो" म्हणाली त्याची  एक कविता
तुझ्या मनातली प्रेमाची एक कविता
कधी म्हणतोस तूच एक कविता
खर सांगू तुझं -माझं प्रेम हीच एक कविता

-अमित जहागीरदार
 ०५/०५/२०००
 सांगली